Product Details
मानवी जन्म सफल होण्यासाठी आत्मज्ञानाची आवश्यकता आहे असा सर्व उपनिषदांचा सारभूत संदेश आहे. केनोपनिषदसुद्धा याच सत्यावर भर देऊन मानवमात्राला याच जीवनात आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन अज्ञानाच्या व अपूर्णतेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी कळकळीचे आवाहन करीत आहे. आत्मज्ञान प्राप्त न करता हे जग सोडण्याचा प्रसंग आला तर ती अपरंपार हानी होय असे केनोपनिषदाचे सांगणे आहे. आत्मा हीच विश्वातील एकमेव सत्य वस्तू असून तिच्याच प्रेरणेने मानवी शरीरातील व बाह्य विश्वातील सर्व कार्ये चालू आहेत. आत्मपरीक्षण व बाह्य सृष्टीचे निरीक्षण करून आत्मानुसंधानाद्वारे साधकाने आत्म्याशी एकरूप व्हावे आणि संसारबंधनातून, जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हावे असे केनोपनिषदाचे ऋषी सांगतात. प्रस्तुत उपनिषदात आत्मज्ञानाच्या साधनेचेही दिग्दर्शन करण्यात आले आहे. विविध रूपांत प्रकट होणार्या आत्म्याची उपासना कशी करावी, आत्मचिंतन वा आत्मानुसंधान कसे करावे यासंबंधीचे मार्गदर्शन ऋषींनी या उपनिषदात केले आहे. या साधनेच्या द्वारे आत्मज्ञान झाल्यावर मनुष्याचा सच्चिदानंदस्वरूप आत्मबोध प्रतिक्षणी जागृत राहतो आणि याच जीवनात त्याला अमृतत्वाचा, शाश्वत सुखाचा, शाश्वत शांतीचा लाभ होतो. मानवाचे जन्मसाफल्य ह्याच प्राप्तीत आहे.