Product Details
आधुनिक कालात विज्ञानाने आणि तांत्रिक ज्ञानाने विलक्षण प्रगती केली असली तरी आधुनिक मानवाचे मन अशांती, वैफल्य, ताण इत्यादींनी ग्रासले गेले आहे. आज शाश्वत जीवनमूल्यांवरील श्रद्धा ढासळत आहे आणि नवीन जीवनमूल्ये समोर नसल्यामुळे आधुनिक मानवाच्या मनात एकप्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. जीवन नियंत्रित करणार्या मूल्यांच्या अभावी व्यष्टि-समष्टी जीवन विस्कळीत झाले आहे. आणि सुकाणू नसलेल्या नौकेप्रमाणे ते भलतीकडेच भटकत चालले आहे. अशा परिस्थितीत उपनिषदांनी दिलेला संदेश आधुनिक मानवाला यथार्थ जीवनदृष्टी देतो, जगाकडे पाहण्याचा सम्यग् दृष्टिकोन देतो आणि समूढ मानवाला सुखशांतीचा मार्ग दाखवितो. आधुनिक मानवाचा रोग आहे जडवादी आणि भोगवादी जीवनदृष्टी; आणि या रोगावर उपाय आहे अध्यात्मावर आधारलेले सम्यग् ज्ञान. उपनिषदे हे सम्यग् ज्ञान देतात आणि आधुनिक मानवाला देहनिष्ठेकडून आत्मनिष्ठेकडे वळवितात. भेदभावना त्यागून अध्यात्मावर अधिष्ठित अशा ऐक्याकडे जाण्याचा ती संदेश देतात.