



M269 Swami Premananda : Jivan va Smrutikatha (स्वामी प्रेमानंद : जीवन व स्मृतिकथा)
Non-returnable
Tags:
Product Details
स्वामी प्रेमानंद अर्थात बाबूराम महाराज हे श्रीरामकृष्णांच्या अंतरंगीच्या ईश्वरकोटी शिष्यांपैकी एक होते. त्यांच्या उच्च आध्यात्मिक अधिकाराबाबत श्रीरामकृष्णांनी वेळोवेळी प्रशंसोद्गार काढलेले आहेत. ते म्हणत, “बाबूराम विशुद्धकुलीन आहे, त्याची हाडेदेखील पवित्र आहेत!” बाबूराम महाराजांच्या ऋजू व प्रेमळ स्वभावामुळे स्वामी विवेकानंदांनी त्यांचे ‘स्वामी प्रेमानंद’ असे नामकरण केले. श्रीरामकृष्णदेवांचे चरित्र व उपदेश यांचे अध्ययन करणाऱ्या वाचकांना, त्यांच्या अंतरंगीच्या संन्याशी शिष्यांच्या चरित्रासंबंधी काही माहिती अवश्य मिळते. परंतु, या शिष्यांच्या जीवनात श्रीरामकृष्णांच्या संस्पर्शाने जे अद्भुत आध्यात्मिक स्थित्यंतर झाले होते, ते “कळण्यास या शिष्यांचे नंतरचे जीवन व त्यांचे उपदेश यांचे अध्ययन अतिशय उपकारक आहे. आध्यात्मिक जीवनातील अनेक बारकाव्यांची माहिती या शिष्यांच्या जीवनात घडलेल्या लहानमोठ्या प्रसंगांतून आपल्याला होते. खऱ्या अर्थाने ‘कृतार्थ जीवन’ कशाला म्हणतात याचा वस्तुपाठच आपल्याला मिळतो.
कालांतराने बेलुर मठाची स्थापना झाल्यावर त्याच्या साऱ्या व्यवस्थापनाचा भार तसेच नवागत साधूंच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वामी प्रेमानंदांनी स्वतःवर घेतली. त्यांच्या प्रेमळ पण तितक्याच दक्ष स्वभावामुळे अगणित युवकांच्या जीवनाला अध्यात्मविद्येचे अधिष्ठान प्राप्त झाले. मठात येणारी भक्तमंडळी अधिकाधिक ईश्वराभिमुख कशी होतील याकडे त्यांचे जातीने लक्ष असे. स्वामी प्रेमानंद महाराजांनी तत्कालीन पूर्वबंगालमध्ये केलेले धर्मप्रसाराचे कार्यदेखील लोकोत्तर असेच म्हणावे लागेल. त्यांच्या या बहुमुखी कार्यकौशल्याचे व मुख्यतः ईश्वरसमर्पित दिव्य चारित्र्याचे अनेकानेक दिव्य प्रसंग आपल्याला या ग्रंथात वाचायला मिळतील.