M268 Yugapravartak : Swami Vivekananda (युगप्रवर्तक : स्वामी विवेकानंद)
Non-returnable
Out of stock
Tags:
Rs.80.00
Author
Dr. Ananta Adavadkar Pages
486 Product Details
राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरांपलीकडला एक आगळावेगळा इतिहास आपल्या मानवजातीला आहे. विशेषतः भारतवर्षात, हरेक कालखंडातच आध्यात्मिकतेने संपन्न, दिव्यशक्तिशाली एक विभूती अवतरली आहे आणि अखिल मानवजातीसाठीच आदर्श असा उदात्त-उन्नत जगण्याचा मार्ग प्रत्यक्ष आचरून गेली आहे. त्यांच्या अशा प्रत्यक्ष जगण्यातूनच कालांतराने समाजाची सारीच अंगे प्राणवान होतात असा आपला इतिहास राहिला आहे.
रामकृष्ण-विवेकानंद हा असाच एक संयुक्त आदर्श आहे. यांच्या प्रत्यक्ष जगण्यातून मूर्त झालेले जीवनादर्श आजच्या मनुष्याला, त्याच्याच आवश्यकतेनुसार कशारीतीने सांत्वना, बल व प्रेरणा देत आहेत हे विशेष दखलपात्र आहे. स्वामी विवेकानंदांचे प्रत्यक्ष कार्य व त्यांचे योगदान यांवर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ असला तरी त्यामागे अद्वैत वेदान्ताची तत्त्वे व श्रीरामकृष्णांची प्रेरणा आहे हे आपण दृष्टिआड होऊ देता कामा नये.
धर्मावर काजळी चढल्यानंतर कालांतराने समाजात अराजकता माजते आणि धर्म पुनश्च आपल्या महिम्यात सुप्रतिष्ठित झाला की सारेच समाजजीवन सुव्यवस्थित स्पंदू लागले हे भारतातील सुधीजनांना विदित आहेच. धर्मसंस्थापना व युगप्रयोजन हा विषय प्रस्तुत ग्रंथाच्या प्रारंभी सुबोधरीत्या मांडण्यात आला आहे. तदनंतरच्या भागांत समाजवादाचे चिंतक, राष्ट्रवादाचे प्रेरक आणि एक शिक्षणतज्ज्ञ अशा रूपांतील स्वामी विवेकानंदांचे दर्शन घडते.
ग्रंथाच्या उत्तरार्धात – स्वामी विवेकानंदांचा स्वतःच्या अंतर्मनाशी झालेला ‘काव्यसंवाद’, त्यांच्या सार्वजनिक जीवनातील नातेसंबंधांवर प्रकाश टाकणारा ‘जनसंवाद’ व निकटवर्तीयांशी ” “झालेला ‘पत्रसंवाद’ – रेखाटण्यात आला आहे. या साऱ्याच विवेचनाचा महाराष्ट्रातील पूर्वापार घडामोडी व व्यक्तिविशेष यांच्याशी एक अनुबंध जोडल्याने ग्रंथ अधिक मनोवेधक झाला आहे याची खात्री वाचकांना पटेलच.
‘संवाद’ (Communication) म्हणजे केवळ दोन अथवा अधिक व्यक्तींनी एकमेकांशी ‘बोलणे’ एवढेच नसून या शब्दाला आधुनिक युगामध्ये अनेक आयाम प्राप्त झाले आहेत. संवाद हा एक अभ्यासाचा नवीनच विषय विद्यापीठीय अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्यात आला आहे. या विषयाचा जे अभ्यास करतात, त्यांच्यानुसार संवाद म्हणजे प्रत्यक्ष बोलणे वा लिखाण अथवा इतर कोणत्याही माध्यमातून – जसे, सध्याच्या आपल्या काळातील ‘माहिती तंत्रज्ञाना’च्या माध्यमातून (Information Technology), अनेकांनी एकाशी अथवा एकाने अनेकांशी अर्थपूर्ण माहितीची देवघेव करणे. या संवादाचे तसे चार भाग होतात, यामध्ये बोलणे-ऐकणे – शब्दांचा उपयोग करून अथवा न करून, लिखित स्वरूपात आणि वस्तुनिष्ठ व्यक्तिनिरपेक्ष स्वरूपातील संवादांचा समावेश होतो.
श्रीरामकृष्णांनी नरेंद्रनाथ व इतर शिष्यांबरोबर साधलेले संवाद, तसेच त्यांनी इतर जनांशी साधलेले संवाद आणि नंतर स्वामी विवेकानंदांनी अत्यंत व्यापक स्वरूपातील साधलेले विविधांगी प्रभावी जनसंवाद, पत्रसंवाद – या सगळ्या संवादांतून आपल्याला आधुनिक काळातील ‘संवाद-कौशल्या’ची वेगवेगळी अंगे परिपुष्ट व प्रभावीपणे अभिव्यक्त झाल्याची दिसून येतात. श्रीरामकृष्ण-विवेकानंदांनी अभ्यासपूर्वक सहेतुक या संवादकौशल्याचा वापर केला नसला तरी अखेर त्या सगळ्यांचा एकत्रित युगप्रवर्तनरूप परिणाम आपल्याला समाजात पाहायला मिळतोच. समाजावर झालेल्या या परिणामांचा अभ्यास हा सुद्धा एक स्वतंत्र व विस्तृत विषय आहे.
'जीवन विकास’ चे मान्यवर संपादक डॉ. श्री. अनंत अडावदकर यांच्या साक्षेपी लेखणीतून हा ग्रंथ साकारला आहे. पूर्वी ‘जीवन विकास’ मध्ये जानेवारी २००९ ते डिसेंबर २०१४ दरम्यान प्रकाशित झालेली लेखमाला, योग्य ती भर घालून व संपादन करून अधिक समग्रतेने ग्रंथरूपात साकारत आहे. डॉ. अडावदकरांनी हे अतिशय मौलिक लेखन करून रामकृष्ण-विवेकानंद साहित्यात मोलाची भर घातली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो व त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देत आहोत. स्वामी विवेकानंदांचा असा दृढ विश्वास होता की श्रीरामकृष्णांच्या आविर्भावाने, त्यांच्या जीवनादर्शाने आर्यजातीचा खरा वैदिक धर्म लोकांना कळेल.