Book Store | Ramakrishna Math Pune
0
MATRU CHARANI -M-140

M110 Matru Charani (मातृचरणी :श्रीसारदादेवींची संभाषणे)

Non-returnable
Rs.140.00
Author
Compilation
Pages
414
Translator
Swami Vagishwarananda

Choose Quantity

Add to Cart. . .
Product Details
मानवजातीच्या उद्धारासाठी परब्रह्म युगीयुगी नरदेह धारण करून धराधामी अवतरत असते. वर्तमानयुगात ते श्रीरामकृष्णांच्या रूपात अवतरले. परब्रह्माच्या या सांप्रतच्या नरलीलेत सहायक होऊन युगप्रयोजन सिद्धीस नेण्याकरता ब्रह्मशक्ती ही श्रीसारदादेवींच्या रूपात अवतीर्ण झाली. ‘अग्नी आणि त्याच्या दाहकशक्ती’ प्रमाणे ब्रह्म आणि ब्रह्मशक्ती अभिन्न होत. म्हणून श्रीरामकृष्ण आणि श्रीसारदादेवी यांच्यात स्वरूपतः काहीही भेद नाही. परंतु असे असले तरी अभिव्यक्तीच्या दृष्टीने पाहता दोघांच्या जीवनात आपल्याला निरनिराळी वैशिष्ट्ये आढळून येतात. या वैशिष्ट्यांचे श्रद्धापूर्वक अनुशीलन केले म्हणजे परमार्थसत्याच्या स्वरूपाची स्पष्ट कल्पना येते.आजच्या जडवादी भोगैकसर्वस्व युगातील भोगपरायण मानवाच्या कल्याणार्थ श्रीरामकृष्ण-सारदादेवींनी आपल्या अलौकिक दांपत्यजीवनाद्वारे त्याग-पावित्र्याचा जो अत्युच्च आदर्श जगापुढे ठेवला त्याची जोड जगाच्या आध्यात्मिक इतिहासात अन्यत्र कुठेच आढळत नाही. श्रीरामकृष्ण हे मातृभक्त बालकच होते – जगातील यच्चयावत् सर्वच नारीजातीच्या ठिकाणी त्यांना सतत जगज्जननीचा साक्षात्कार होत असे; आणि श्रीसारदादेवी – माताजी – तर या सर्वांच्याच आई होत्या. आपल्या लीलाजीवनात श्रीरामकृष्ण ज्या दिव्य मातृभावाचे उपासक म्हणून वावरले त्या दिव्य मातृभावाची श्रीसारदादेवी मूर्तिमंत प्रतिमाच होत्या. तसे तर त्यांचे जीवन म्हणजे आदर्श नारीत्वाचा सर्वोच्च विकासच होय. त्या आदर्श कन्या होत्या, आदर्श पत्नी होत्या, आदर्श गृहिणी होत्या, आदर्श संन्यासिनी होत्या, आदर्श शिष्या होत्या, आदर्श गुरू होत्या – परंतु या सर्व असल्या तरी त्या सर्वप्रथम ‘आई’ होत्या – लौकिक अर्थाने नव्हे तर पारमार्थिक अर्थाने त्या जड-चेतन, चर-अचर सर्वांची आई होत्या – जगज्जननी होत्या! त्यांच्या दिव्य व्यक्तित्वात पार्थिव अपूर्णतेचा स्पर्श देखील नव्हता. त्या पवित्रच नव्हत्या तर पवित्रतास्वरूपिणी होत्या. त्यांच्या व्यक्तित्वाचा सहज आविष्कार म्हणून प्रेम, करुणा, क्षमा, शांती, सरलता, निरभिमानिता, त्याग, वैराग्य, ज्ञान, भक्ती इत्यादी सर्वच दैवी संपदांचा परमोत्कर्ष त्यांच्या ठिकाणी प्रकटलेला पाहून मन आपोआप त्यांच्या चरणी श्रद्धावनत होते. श्रीरामकृष्णांच्या लीलासंवरणानंतर सुमारे चौतीस वर्षं नरदेहात राहून माताजींनी असंख्य जीवांचा उद्धार केला. सदा सर्वात्मभावाच्या अत्युच्च शिखरावर प्रतिष्ठित राहूनही लोकानुकंपेने मायेचा आश्रय घेऊन त्या मनाला खालच्या भूमिकेवर ओढून ठेवण्याचा प्रयत्न करीत. स्वतःचे खरे स्वरूप झाकून एखाद्या सामान्य स्त्रीप्रमाणे नाना प्रकारच्या घरकामांत त्या स्वतःला गुंतवून ठेवीत. पण त्या संसारात होत्या तरी संसार त्यांच्यात नव्हता. संसारतापदग्ध जीवांच्या दुःख-कष्टांनी व्यथित होऊन त्यांना संसारबंधनातून मुक्त करण्यासाठी ही करुणामयी जननी रात्रंदिवस सतत झटत असे. दीन, दुःखी, दुर्बल, पीडित, पतित सर्वांनाच त्यांनी प्रेमाने जवळ केले व त्यांच्यावर करुणामृताचा वर्षाव करून त्यांना धन्य करून सोडले. माताजी सहज सरळ भाषेत, अल्प शब्दांत जे काही बोलत त्यांत श्रोत्याचे जीवन आमूलाग्र बदलून टाकण्याचे सामर्थ्य असे. त्यांच्या चरणांची छत्रछाया लाभून व त्यांची अमृतमय संभाषणे श्रवण करून धन्य झालेल्या स्त्रीपुरुषांची गणना करता यावयाची नाही. सुदैवाने अशा परमभाग्यवान व्यक्तींपैकी काहींनी आपल्या दैनंदिनीत माताजींची काही संभाषणे लिपिबद्ध करून ठेवली होती. त्या भावपूर्ण मधुर संभाषणांचा इतरांनाही लाभ घेता यावा म्हणून माताजींच्या लीलासंवरणानंतर लवकरच उद्बोधन कार्यालयातर्फे त्यांचे संकलन ‘श्रीश्रीमायेर कथा’ (श्रीमाताजींच्या गोष्टी) या नावाने दोन खंडांत प्रसिद्ध करण्यात आले होते. माताजींच्याच अपार करुणेने त्या मूळ बंगाली ग्रंथाचा मराठी अनुवाद या पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध झाला आहे.


Added to cart
- There was an error adding to cart. Please try again.
Quantity updated
- An error occurred. Please try again later.
Deleted from cart
- Can't delete this product from the cart at the moment. Please try again later.