Product Details
स्वामी अखंडानंद हे भगवान श्रीरामकृष्णांचे अंतरंग लीलासहचर होते. त्यांचे जीवन म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी निर्देशिलेल्या ‘शिवभावे जीवसेवे’ चे मूर्त रूपच होते. बालवयातच त्यांना श्रीरामकृष्णांच्या निकट सहवासात राहण्याचे सद्भाग्य लाभले. श्रीरामकृष्णांच्या कृपाआशीर्वादाने त्यांच्या ठिकाणची आध्यात्मिक शक्ती जागी झाली व त्यांच्या आदेश-निर्देशानुसार ते साधनेत निमग्न झाले. श्रीरामकृष्णांनी इहलोकीची लीला संपवून दिव्यधामी प्रयाण केल्यानंतर लवकरच स्वामी अखंडानंद निष्कांचन परिव्राजकाच्या रूपात बाहेर पडले व सर्वस्वी ईश्वरेच्छेवर अवलंबून राहून कैलास, मानससरोवर, तिबेट व हिमालय येथील विभिन्न ठिकाणी त्यांनी भ्रमण केले. देवतात्मा नगाधिराज अशा हिमालयाच्या शांत व शुचि-गंभीर वातावरणात सहा वर्षे खडतर तपश्चर्येत मग्न राहिल्यानंतर अद्वैतबोधामधे दृढप्रतिष्ठित होऊन ते खाली आले आणि उर्वरित आयुष्य त्यांनी नरनारायणाच्या सेवेत व्यतीत केले. प्राणिमात्राच्या दुःखाने त्यांचे अंतःकरण व्याकुळ होई. आर्त-पीडितजनांचे दुःख दूर करण्याकरता ते प्राणापलीकडे झटत. आपल्या देशातील दीनदरिद्री लोकांना पोटभर अन्न व आवश्यक असलेले वस्त्र मिळावे, त्यांच्या मुलांना योग्य शिक्षण मिळावे, त्यांच्या स्वास्थ्योन्नतीची व्यवस्था व्हावी, आजारपणात त्यांची योग्य चिकित्सा आणि सेवाशुश्रूषा व्हावी, त्यांचे नैतिक चारित्र्य सुदृढ व्हावे – यासाठी स्वामी अंखडानंदांच्या प्रयत्नांना विराम नव्हता. परंतु त्यांच्या ठिकाणी कर्तृत्वबुद्धीचा लवलेशही नसून ‘मी प्रभूच्या हातातील यंत्र असून तोच कर्ता-करविता आहे’ हा त्यांच्या जीवनाचा स्थायी भाव होता. नारायण बुद्धीने आर्त-रुग्ण जनांची सेवाशुश्रूषा करत असतांना कित्येकदा ते देहभान विसरून समाधिमग्न होत. विराट विश्वव्यापी चैतन्याशी ते एकरूप झाले होते. नाना रूपांनी नटलेल्या त्या एकमेव अद्वितीय चैतन्यघनाची सेवा हा त्यांच्या बोधाचा स्वाभाविक आविष्कार होता. संपूर्ण ‘रामकृष्ण मठ आणि मिशन’ चे अध्यक्ष झाल्यानंतर देखील, सारगाछी या लहानशा खेडेगावी त्यांनी स्थापलेल्या आश्रमात राहून तेथील दीनदुःखी लोकांची सेवा करण्यातच ते आनंद मानीत. त्यांच्या तपःपूत त्यागमय व्यक्तित्वाच्या संस्पर्शात येऊन कितीतरी लोकांची जीवने उजळून निघाली!स्वामी अखंडानंद प्रसिद्धिपराङ्मुख होते. आपल्या कार्याचा अहवाल देखील प्रसिद्ध करणे त्यांना आवडन नसे. परंतु उत्तर आयुष्यात जेव्हा त्यांनी बघितले की रामकृष्ण-संघातर्फे चालविण्यात येणाऱ्या सेवाकार्याच्या पार्श्वभूमीबद्दल माहीत नसल्यामुळे त्याच्याविषयी लोकांमधे चुकीच्या समजुती पसरत आहेत तेव्हा त्यांनी यथार्थ सत्य उघडकीस आणण्याच्या हेतूने आपल्या आठवणी सांगायला सुरुवात केली व भक्तांना त्या लिहून ठेवण्यास सांगितले. परंतु सर्व आठवणी सांगून होण्यापूर्वीच त्यांनी समाधी घेतल्यामुळे सेवाकार्याचा इतिहास अपूर्णच राहून गेला. तरी त्यांच्या या स्मृतिसंग्रहातून भगवान श्रीरामकृष्णांच्या आठवणी, श्रीरामकृष्णांच्या महासमाधीनंतर त्यांनी केलेल्या भ्रमणाचा आंशिक वृत्तान्त, आलमबाजार मठातील जीवनाची काही चित्रे आणि तेथील निष्कांचन संन्याशांनी आरंभलेल्या सेवाव्रताचे त्रोटक वर्णन वाचताना वाचकांना एका संपूर्ण निःस्वार्थ आणि ईश्वरनिर्भर महामानवाच्या सान्निध्यात वावरण्याचा आनंददायक अनुभव येतो.