M272 Sri Matajinchya Charanashrayee - 1 (श्रीमाताजींच्या चरणाश्रयी - भाग १)
Non-returnable
Tags:
Rs.120.00
Author
Compilation Pages
380 Translator
Smt. Shakuntala D Punde Choose Quantity
Product Details
जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचा प्रादुर्भाव होतो, तेव्हा तेव्हा परमकारुणीक भगवान या पृथ्वीतलावर नरदेह धारण करून येतात आणि आपल्या लीलाजीवनाच्या माध्यमातून असंख्य जनांचा उद्धार आणि धर्माची पुनर्स्थापना करतात. युगीयुगी त्यांची ही अद्भुतरम्य गूढ लीला सुरू आहे. ज्या ज्या वेळी परब्रह्म नरदेह स्वीकृत करून अवनीतलावर अवतरतात, त्या त्या वेळी त्यांच्यासोबतच त्यांची पराशक्ती किंवा ब्रह्मशक्ती अवतरत असते. सांप्रतच्या युगात हे परब्रह्म ‘श्रीरामकृष्णां’च्या रूपाने अवतीर्ण झाले, तर त्यांच्या लीलेत सहायक होऊन युगप्रयोजन सिद्ध व्हावे यासाठी पराशक्ती ही ‘श्रीसारदादेवीं’च्या रूपाने ‘जयरामवाटी’ या बंगालमधील एका लहानशा खेडेगावी अवतीर्ण झाली. ‘ब्रह्म व ब्रह्मशक्ती अभेद आहेत’ – श्रीरामकृष्णदेवांच्या या उक्तीनुसार श्रीरामकृष्ण आणि माताजी श्रीसारदादेवी हे स्वरूपतः अभेदच असले तरी अभिव्यक्तीच्या रूपाने पाहता दोघांच्या जीवनाची वेगवेगळी वैशिष्ट्ये दिसून येतात. श्रद्धासंपन्न होऊन त्यांच्या वैविध्यपूर्ण गुणांचे व वैशिष्ट्यांचे अनुसंधान केले असता आपल्यासारख्या साधकांची आध्यात्मिक जीवनात उन्नती होईल आणि आपले जीवन परमसत्याच्या दर्शनाने परिपूर्ण होत जाईल.
श्रीरामकृष्णदेव त्यांच्या लीलाजीवनात दिव्य मातृभावाचे उपासक म्हणूनच वावरले आणि त्याच दिव्य मातृभावाची मूर्तिमंत प्रतिमा श्रीसारदादेवी होत्या. त्यांचे संपूर्ण जीवनच आदर्श नारीत्वाचा सर्वोच्च विकास होता. एकाच आधारी त्या आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श गृहिणी आणि आदर्श संन्यासिनी सुद्धा होत्या. लौकिक अर्थाने त्यांनी विधीपूर्वक संन्यास ग्रहण केला नसला तरी त्यांचे जीवन आदर्श संन्यासिनीचेच होते. म्हणूनच त्या स्वतः आदर्श शिष्या तर होत्याच शिवाय असंख्य शिष्यांच्या आदर्श “होत्या. लौकिक अर्थाने नव्हे तर पारमार्थिक दृष्ट्या त्या सर्वांच्या, अगदी जड-चेतन, चर-अचर, पशू-पक्षी सगळ्यांच्याच ‘आई’ होत्या. त्यांच्या दिव्य व्यक्तिमत्त्वाचा सहजपणे होणारा आविष्कार त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्याकडे सहजभावे आकर्षित करीत असे. श्रीमाताजी पवित्र होत्या असे नव्हे तर त्या साक्षात पवित्रतास्वरूपिणी होत्या. प्रेम, करुणा, क्षमा, शांती, ऋजुता, निरभिमानता, त्याग, वैराग्य, ज्ञान, भक्ती या आणि इतरही दैवी गुणांचा परमोत्कर्ष माताजींमध्ये प्रकटलेला होता. त्यांच्या चरणाश्रयी येणाऱ्या प्रत्येकाला ह्यातील गुणांचा स्पर्श लाभून त्याचे जीवन परिपूर्ण आणि धन्य होत असे.
भगवान श्रीरामकृष्णांच्या पार्थिव लीलासंवरणानंतर दीर्घ चौतीस वर्षे मानवी देहात राहून माताजींनी असंख्य जीवांवर कृपेची उधळण केली. त्या सदैव वेदान्तोक्त सर्वात्मभावाच्या अत्युच्च शिखरावर अवस्थित असत, तरीदेखील सर्वसाधारण जनांवरील अनुकंपेमुळे आपल्या मायाशक्तीचा आश्रय घेऊन त्या स्वतःच्या मनाला सामान्य भूमीवर ओढून ठेवण्याचा प्रयत्न करीत. स्वतःचे खरे दैवीस्वरूप झाकून एखाद्या साधारण स्त्रीप्रमाणे त्या नाना प्रकारच्या दैनंदिन घरकामांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवत असत. त्या ‘संसारातीत’ असूनही संसारातील त्रितापांनी दग्ध जीवांच्या दुःखांनी व्यथित होत असत आणि म्हणूनच ही करुणामय जननी आपल्या संतानांना संसारबंधनांतून मुक्त करण्यासाठी रात्रंदिवस झटत असे. त्यांच्या कृपेचा वर्षाव दीन, दुःखी, दुर्बल-सबल, पीडित, पतित, पापी-पुण्यवान, विद्वान-अडाणी, संन्यासी-गृहस्थ आबालवृद्ध सर्व नरनारींवर समान भावे वर्षत असे. त्यांच्या कृपेपासून वंचित राहिलेला कोणीही नव्हता. सर्व मनुष्यमात्रच नव्हे तर पशुपक्ष्यांवरही त्यांची कृपा बरसत असे. श्रीमाताजींची दोन वचने “माझे मूल जर चिखलाने भरले किंवा धुळीत लोळले तर धावत जाऊन त्याला उचलणे, स्वच्छ करणे आणि मांडीवर घेणे हे माझे कर्तव्यच नाही काय?”
श्रीमाताजींचा सरळ मधुर व्यवहार, त्यांच्या सहवासात येणाऱ्या सगळ्यांना आपलेसे करून घेणारे त्यांचे निर्व्याज प्रेम, ऐकणाऱ्याचे जीवन आमूलाग्र बदलण्याचे सामर्थ्य असणारी त्यांची सरळ भाषा – हे सगळेच अद्भुत होते. त्यांच्या चरणाश्रयी आलेल्या आणि त्यांची अमृतमय वचने ऐकून धन्य झालेल्या असंख्य नरनारींपैकी काही भाग्यवान व्यक्तींनी ती संभाषणे लिहून ठेवली, तर काहींनी ती चिरस्मरणीय संभाषणे नंतरच्या काळात लिपिबद्ध केली.
आजच्या काळात आपल्याला ही संभाषणे व प्रसंग उपलब्ध झालेले आहेत. कोलकात्याच्या ‘उद्बोधन कार्यालया’द्वारे त्यांपैकी काही संवादांचे व प्रसंगांचे पुस्तकरूपाने प्रकाशन करण्यात आले. स्वामी पूर्णात्मानंदजींनी अतिशय मेहनतीने अशा अनेक संवादांचे व प्रसंगांचे संकलन केले. यासाठी त्यांनी माताजींच्या अनेकानेक शिष्यांकडून साहित्य मिळवले आणि काहींचे शब्दांकन केले. मूळ बंगाली भाषेत असलेला हा अप्रतिम ठेवा “श्रीश्रीमायेर पदप्रान्ते” या नावे चार खंडांत प्रकाशित करण्यात आला. वेळोवेळी त्यामध्ये भर पडत गेली. या चार खंडांमध्ये एकंदर तेरा पर्वे आहेत. प्रत्येक पर्वाचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. त्यामधील विषयवैविध्य लक्षणीय आहे. त्यांमधील लेखांचे वाचन केल्याने श्रीमाताजींच्या संतानांना आपण त्यांच्या साक्षात सान्निध्यात असल्याचा अनुभव अवश्य येतो.