Product Details
भारतीय जनजीवनात आज अशांती, वैफल्य, असंतोष ही दिसून येत आहेत आणि त्यामुळे देशात एकप्रकारचा गोंधळ निर्माण झाला आहे. केवळ भौतिक विकासाने किंवा केवळ आर्थिक उन्नतीने देशातील परिस्थिती सुधारणार नाही, तर त्याबरोबरच आध्यात्मिक व नैतिक जीवनमूल्ये जनजीवनात प्रतिष्ठित व्हावयास हवीत. नुसत्या भौतिक व आर्थिक उत्कर्षांचे समाजावर कसे दुष्परिणाम होतात हे पाश्चात्त्य देशांतील आजची परिस्थिती बघितली म्हणजे सहज कळून येते. श्रीरामकृष्ण-विवेकानंदांनी ‘सर्वधर्मसमन्वय’ आणि ‘शिवबोधाने जीवसेवा’ ही जी दोन महान तत्त्वे स्वत:च्या आचरणाने भारतीयांना शिकवली आहेत त्यांच्या आधारे भारताचा सर्वांगीण विकास घडून येऊ शकतो आणि भारतातील गोंधळ दूर होऊ शकतो. वैयक्तिक व सामूहिक जीवनात, तसेच राजनैतिक, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रांत जर ही दोन तत्त्वे कृतीत आणली गेली तर जीवनाच्या सर्व विभागांत शांती, संतोष, उत्कर्ष ही नांदू शकतील आणि भारताच्या पुनरुत्थानाचे कार्य सफल होईल. श्रीरामकृष्ण-विवेकानंदांनी मनुष्याच्या दिव्य स्वरूपावर आधारलेली व खरी माणुसकी निर्माण करणारी जी उज्ज्वल व सर्वस्पर्शी जीवनदृष्टी भारतीयांना दिली आहे तिच्यापासून स्फूर्ती व प्रेरणा घेऊन जीवनाला नवीन आकार दिल्यास भारताची सर्व क्षेत्रांत भरभराट होईल यात शंका नाही.