Product Details
साधक-अवस्थेपासूनच स्वामी विवेकानंदांना भगवान बुद्धांच्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचे फार आकर्षण वाटत असे. त्या आकर्षणापायी श्रीरामकृष्ण विद्यमान असतानाच ते अल्प काळासाठी बोधगयेला जाऊन आले होते व तेथे त्यांना गभीर ध्यानावस्थेत भगवान बुद्धांच्या दिव्य आस्तत्वाचा जिवंत प्रत्ययही आला होता. ते बौद्ध धर्मग्रंथांचे श्रद्धेने अध्ययन-अनुशीलन करीत व आपल्या गुरुबंधूंनाही तसे करण्यास प्रोत्साहित करीत. आपल्या आयुष्यातील विभिन्न प्रसंगी, विभिन्न प्रकारे त्यांनी बुद्धदेवांचे दिव्य जीवन, त्यांची शिकवण, त्यांचा धर्म इत्यादींच्या संदर्भात फारच मौल्यवान विचार व्यक्त केले आहेत. त्यांतील जेवढे काही विचार लिपिबद्ध स्वरूपात उपलब्ध आहेत तेवढ्यांवरूनच स्वामीजी बुद्धदेवांविषयी किती श्रद्धा नि प्रेमादर बाळगीत होते याची ओळख पटते. त्याबरोबरच या विचारांमधून बुद्धदेवांच्या दिव्य व्यक्तिमत्वाचेही हृदयंगम दर्शन घडते.