Product Details
श्रीविद्यारण्यस्वामीविरचित ‘जीवन्मुक्तिविवेक’चे सार वेदशास्त्रसंपन्न बापटशास्त्री यांनी या ग्रंथात आणले आहे. तेव्हा हे त्या सुंदर ग्रंथाचे शब्दशः भाषांतर नव्हे, हे निराळे सांगण्याचे प्रयोजन नाही. तरीपण त्या ग्रंथातील कोणताही मुख्य भाग यात सोडलेला नाही. शिवाय त्यातील रमणीय अवतरणे यात आवर्जून दिलेली आहेत, एवढे येथे सांगणे अवश्य वाटते.
‘जीवन्मुक्तिविवेकसार’ या ग्रंथाचे लेखक श्रीविद्यारण्यस्वामी हे आद्य श्रीशंकराचार्यांच्या अद्वैत वेदान्त परंपरेमधील एक होते. वेदान्ताच्या अग्रगण्य आचार्यांमधे त्यांचे नाव आवर्जून घेतले जाते. श्रीमद् शंकराचार्यांनी भारताच्या चार दिशांना स्वतः स्थापन केलेल्या पीठांपैकी शृंगेरी पीठाचे इ.स. १३७७ ते १३८६ पर्यंत श्रीविद्यारण्यस्वामी पीठाधीश्वर होते. त्यांनी या ग्रंथाशिवाय अद्वैतवेदान्तपर अनेक ग्रंथांची रचना केली. त्यांची भाषा विद्वत्ताप्रचुर पण अतिशय सुललित व प्रसन्न-गंभीर अशी आहे. आजही अद्वैत वेदान्ताच्या अभ्यासकांना त्या ग्रंथांचा मोलाचा उपयोग होत आहे. त्या ग्रंथांची नावे – पंचदशी, दृग्-दृश्य-विवेक, सर्व-दर्शन-संग्रह, अनुभूतिप्रकाश, विवरण-प्रमेय-संग्रह, उपनिषद-दीपिका तसेच श्रीशंकरदिग्विजय इत्यादी. या ग्रंथांतून श्रीविद्यारण्यस्वामींचे शास्त्रांचे गाढे अध्ययन, सखोल आध्यात्मिक दृष्टिकोन, जाज्वल्य ईश्वरभक्ती हे दिसून येते. शिवाय, त्यांच्या हृदयात जीवांचे क्लेश पाहून जागृत होणारी करुणा याचेही मनोभावी दर्शन या ग्रंथांतून होते.
वैदिक धर्माचे प्रवृत्ती व निवृत्ती असे दोन प्रकार आहेत. प्रस्तुत ग्रंथ शुद्ध निवृत्तिमार्गाचे – तत्त्वज्ञान, मनोनाश व वासनाक्षय इत्यादींचे प्रतिपादन करणारा आहे. तरी प्रवृत्तिमार्गाच्या लोकांनाही या ग्रंथाच्या वाचनापासून पुष्कळ चांगल्या व उपयुक्त गोष्टी कळतील. जीवन्मुक्ती म्हणजे काय, संन्यासी “असल्या ग्रंथांच्या वाचनापासून मनावर झालेले परिणाम व्यर्थ जाणार नाहीत. या ग्रंथामुळे प्रवृत्तिमार्गी लोकांना जीवनाची उच्चतर दिशा गवसेल तर निवृत्तिमार्गी जनांना अनमोल मार्गदर्शन लाभेल.