

Product Details
श्रीरामकृष्णदेवांच्या प्रत्यक्ष पावन व दिव्य संस्पर्शात येऊन अनेक जणांची जीवने धन्य झाली आहेत. स्वामी विवेकानंदादी संन्यासी शिष्य व बलराम बोस, गिरीशचंद्र घोष वगैरे असंख्य गृहस्थाश्रमी भक्तजन याची साक्ष होत. अशा संन्यासी व गृहस्थ भक्तांनी ‘रामकृष्ण संघा’चा विशाल परिवार बनलेला आहे. त्याच परंपरेत या ‘रामकृष्ण संघा’तील प्रथम पिढीच्या, श्रीरामकृष्ण-पार्षदांच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊन ज्यांची जीवने धन्य झाली आणि त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय जीवनावर व समाज मनावर एक प्रकारचा अमिट असा ठसा ज्यांनी उमटवला होता, त्यांपैकी एक होते श्री. बोशी सेन. अत्यंत कष्टदायक, हलाखीच्या परिस्थितीतून वर येऊन त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. सोबतच रामकृष्ण संघाच्या संन्यासीवृंदाच्या सहवासात येऊन उच्च जीवन घडवणारी मूल्ये आत्मसात केली. त्यांची महत्त्वाकांक्षी जागी झाली. स्वतःमधील विद्या-बुद्धी-कौशल्य आणि आत्मसात केलेली जीवनविषयक उदात्त मूल्ये यांची योग्य ती सांगड घालून त्यांनी गृहस्थाश्रमात निर्वाह केला. भारतासाठी त्यांनी स्वतःची बुद्धी व कृषिविषयक संशोधन अक्षरशः पणाला लावले. त्याच्याच फलस्वरूपी आज आपल्याला त्या विशिष्ट क्षेत्रात फार मोठा विकास झालेला दिसून येतो. त्याचे बरेचसे श्रेय श्री. बोशी सेन यांना द्यावे लागेल. त्यांचे चरित्र वाचत असताना ‘रामकृष्ण संघा’चा विचार येणे साहजिकच आहे. म्हणून ‘रामकृष्ण संघा’चा उमलत जाणारा विकास व त्याचा उलगडत जाणारा इतिहास हे सुद्धा या चरित्राचे अविभाज्य अंग झाले आहेत.