Product Details
ज्या व्यवस्थेद्वारा संस्कृती, सभ्यता, जीवन-मूल्ये आणि पूर्वापार संचित ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोचविले जाते त्या प्रणालीला शिक्षण असे म्हणतात. भारतात प्राचीन व्यवस्था अत्यंत उन्नत होती. येेथे तक्षशिला, नालंदा इत्यादी विद्यापीठे विश्वविख्यात होती व त्यात अनेक देशांमधून विद्यार्थी शिकायला येत असत. परंतु बारा शतकांपूर्वी सुरू झालेल्या सामाजिक आणि राजनैतिक उलथापालथीमुळे भारतातील शिक्षणप्रणाली प्राय: संपुष्टात आली. ज्या देशात सार्या जगातून विद्यार्थी शिकण्याकरिता येत असत त्या देशाची शिक्षाप्रणाली अशा प्रकारे नष्ट झाली. ब्रिटिश शासनाच्या काळात इंग्रजांनी आपली सत्ता टिकवून ठेवण्याच्या अट्टाहासापायी नोकर निर्माण करणार्या विशेष शिक्षण प्रणालीचा पुरस्कार केला. स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण भारताचे आणि सार्या जगाचे अवलोकन करून ‘भारताच्या उद्धाराचा एकमात्र उपाय म्हणजे पुरातन शिक्षण-पद्धतीचा पुनरुद्धार करणे होय’ असे ठामपणे सांगितले. स्वामीजींनी शिक्षणविषयक अनेक सूत्रे दिली. त्यांच्या आधारे सद्यपरिस्थितीत आवश्यक अशा शिक्षण-प्रणालीचा अवलंब केल्यास देशाचा व समाजाचा विकास होऊ शकतो.