Product Details
स्वामी विवेकानंदांनी धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, शिक्षण, कला, प्रवास, सामाजिक सुधारणा, राष्ट्रोन्नती इत्यादी विभिन्न महत्त्वपूर्ण विषयांवर जी पत्रे लिहिली होती त्यांचे संकलन प्रस्तुत पुस्तकात केले आहे.
श्रेष्ठ व्यक्तींच्या पत्रांत त्यांचे स्वयंस्फूर्त व तळमळीचे उद्गार स्वाभाविकपणे प्रकट झालेले आपल्याला दिसून येतात. तसेच विविध पत्रांमधे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विभिन्न पैलूंचेही आपल्याला दर्शन घडते. या दृष्टीने स्वामी विवेकानंदांची पत्रे त्यांच्या प्रतिभासंपन्न दिव्य जीवनावर प्रकाश तर पाडतातच, पण त्याबरोबरच त्या जीवनात कोणत्या उदात्त भाव-भावनांचे आविष्करण झाले होते याची देखील आपल्याला स्पष्ट प्रचीती येते.
स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व हे मूलतः आध्यात्मिक स्वरूपाचे होते – ईश्वरकेंद्रित होते. त्यांनी राष्ट्रीय, सामाजिक, धार्मिक किंवा अन्य क्षेत्रांत जी महान कार्ये केली ती सर्व त्यांच्या दिव्य आत्मानुभूतीचीच विभिन्न रूपे होती. त्यांच्या अनेक पत्रांवरून स्पष्टपणे दिसून येते की त्यांना आधी आत्मोन्नती हवी होती, आत्मविकास हवा होता, आणि या आत्मविकासाच्या पायावरच त्यांना राष्ट्रोन्नती हवी होती. या आत्मविकासांतूनच ‘खरा माणूस’ निर्माण होत असतो आणि म्हणूनच त्यांनी आपल्या अनेक पत्रांत ‘माणूस’ तयार करणाऱ्या धर्माची, तत्त्वज्ञानाची व शिक्षणाची आवश्यकता प्रतिपादिली आहे.
त्यांचे स्वतःचे जीवन चैतन्यमय असल्यामुळे त्यांची पत्रे वाचताना वाचकांच्याही हृदयात चैतन्याचा संचार होतो. ही पत्रे एवढी प्रभावी, एवढी स्फूर्तिदायक आहेत की ती थेट वाचकांच्या हृदयाला स्पर्श करतात. या पत्रांमध्ये एवढे ओज, एवढे सामर्थ्य भरलेले आहे की त्यांच्यात वैयक्तिक व सामूहिक जीवनात आमूल क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. स्वतंत्र भारताच्या पुनरुत्थानासाठी या पत्रांचे महत्त्व आज विशेषत्वाने जाणवते, कारण आपला देश आज सर्वांगीण प्रगतीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. प्रस्तुत पुस्तकातील पत्रांची मांडणी तारखांच्या क्रमानुसार केलेली असल्यामुळे विभिन्न कालखंडांत स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे स्वरूप कोणत्या प्रकारचे होते याचे वाचकांना ज्ञान होते.