Rs.300.00
Author
Swami Yatishwarananda Pages
675 Translator
Swami Brahmasthananda Choose Quantity
Product Details
आध्यात्मिक जीवनाची निष्ठापूर्वक साधना करून परमात्म्याचे दर्शन व अनुभव करू इच्छिणाऱ्यांसाठी हा ग्रंथ फार महत्त्वाचा आणि पथ-प्रदर्शक आहे. सामान्यतः मानव ज्या देह व मनाला ‘मी’ समजून जगात व्यवहार करतो, ते त्याचे खरे स्वरूप नाही. मनुष्य वस्तुतः चैतन्यस्वरूप आहे. अज्ञानामुळे चैतन्यस्वरूप शुद्ध आत्म्याचे देह, मन व इंद्रियांशी तादात्म्य आणि अहंकारवश होऊन त्याच्यामध्ये मिथ्या भ्रम निर्माण झाला आहे. यालाच अविद्या वा माया म्हणतात. जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांमध्ये चैतन्य-प्रकाशाचे प्रतिबिंब पडल्यामुळे आपण अज्ञानाने स्थूल, सूक्ष्म व कारण शरीरांमध्ये आबद्ध झालेलो आहोत. परंतु आपले वास्तविक स्वरूप तुरीय नामक अतींद्रिय चेतनावस्था होय, जे सर्वदा अजर, अमर, अविनाशी व शुद्ध-बुद्ध-मुक्त आहे. एकमेव ध्यानयोगाच्या साधनेने ही अलौकिक आत्मानुभूती आपल्याला प्राप्त होऊ शकते.
मनुष्य जन्म दुर्लभ आहे, तरीही असंख्य मानव ऐहिक विषय-भोगातच आपले अमूल्य जीवन व्यर्थ वाया घालवतात. आपल्या सत्य स्वरूप-ज्ञानाच्या अभावी मानव अस्वाभाविक तणाव आणि अनावश्यक मानसिक संघर्षामुळे अस्वस्थ, असंतुष्ट आणि रोगग्रस्त होऊन जातो. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासासोबतच मानव अधिक बहिर्मुख झाला आहे आणि म्हणूनच त्याने आपला मानसिक समतोल गमावला आहे. अशा ह्या संभ्रमित अवस्थेमधे त्याला आपल्या अंतर्निहित देवत्वाचा आणि आपल्या नित्य-शुद्ध-बुद्ध-मुक्त स्वरूपाचा विसर पडला आहे. धर्माच्या नावाने कित्येक लोक चमत्कार व विचित्र कल्पनांना बळी पडून आपल्या स्थूल, सूक्ष्म कामनांच्या पूर्तीची आणि विभिन्न प्रकारच्या सुख-प्राप्तीची अपेक्षा करतात. परंतु त्यांनी त्यांना जीवनात परमशांती व कृतार्थता कधीच प्राप्त होत नाही. ज्या महापुरुषांनी आपल्या जीवनात यथार्थ आध्यात्मिक साधना करून परम सत्य प्राप्त केले आहे, तेच दुसऱ्यांना आध्यात्मिक जीवनात योग्य मार्गदर्शन करू शकतात. आध्यात्मिक जीवन कंठणाऱ्या निष्ठावान साधकांसाठी हा ग्रंथ अगदी प्रारंभिक अवस्थेपासून तर जीवनमुक्ती व आत्मसाक्षात्काराचा सर्वोच्च अनुभव प्राप्त होईपर्यंत सर्व विशिष्ट साधकावस्थांचे सुयोग्य विश्लेषण प्रस्तुत करतो.
या ग्रंथाचे लेखक श्रीमत स्वामी यतीश्वरानंद महाराज आध्यात्मिक जीवनाचे श्रेष्ठ आचार्य, अनुभवसिद्ध अधिकारी आणि साक्षात्कारी महापुरुष होते. त्यांनी मानवी समस्यांचे निराकरण करून असंख्य आध्यात्मिक मार्गाच्या साधक-साधिकांना आध्यात्मिक अतींद्रिय अनुभवांच्या राज्यामध्ये अग्रेसर होण्यास मार्गदर्शन केले आहे. अनेक धर्मग्रंथ, देश-विदेशातील विभिन्न श्रेष्ठ संत व महात्म्यांचे दृष्टांत आणि त्यांनी प्रतिपादलेल्या जीवन-सिद्धांताद्वारे अतींद्रिय आध्यात्मिक जीवनाच्या गभीर तत्त्वांचे विवेचन आणि साधकांच्या मनातील अनेक समस्यांचे निराकरण करून साधना कशा प्रकारे करावयास हवी याचे सुयोग्य दिग्दर्शन व वर्णन प्रस्तुत ग्रंथात आहे. येथे केवळ हिंदुधर्म प्रणीत कर्म, भक्ती, ज्ञान आणि ध्यान योगांच्या साधनांचे प्रतिपादन नाही, तर पाश्चात्त्य मनोविज्ञानाची व पाश्चात्त्य सेंटस्च्या अनुभूतींचीही चर्चा केली आहे. पाश्चात्त्य विद्याविभूषित सुज्ञ वाचकसुद्धा या ग्रंथातील गहन विषयांच्या योजनाबद्ध विश्लेषणात्मक पद्धतीने आणि सरळ सोप्या शैलीने विशेष उपकृत होतील.
आध्यात्मिक जीवन म्हणजे एक अंतर्विज्ञान असते. साधारणतः स्थूल व सूक्ष्म वैषयिक वृत्तींनी मनुष्याचे चित्त आवृत्त असते. आणि म्हणूनच विभिन्न तऱ्हेच्या वृत्तींच्या प्रभावाने आपण अनेक प्रकारची शुभ व अशुभ कर्मे करतो तसेच आपल्याला प्राप्त झालेल्या शक्तींचा अपव्यय करतो व मोहग्रस्त होऊन आपल्या सत्य स्वरूपाला विसरून जातो. आध्यात्मिक जीवनात शारीरिक व मानसिक पवित्रता अपरिहार्य आहे. म्हणून गुरू आपल्या साधक-साधिका शिष्यांना मनात शुभ संकल्प व शुभ कल्पना बाळगण्याचा सल्ला देतात. ज्या साधक व साधिकांना आपल्या जीवनात आध्यात्मिक विकास करण्याची व्याकुळता आहे त्यांनी गुरूपदेशानुसार जप-ध्यान, स्तव-प्रार्थना आणि निष्काम भावाने व ईश्वरार्पण बुद्धीने सेवा-कर्म करून आपल्या मनाला शुद्ध केले पाहिजे. याप्रमाणे भगवद्वृत्ती सदैव चित्तात बाळगून इतर सर्व वृत्तींचा निरास होतो आणि आपण ईश्वराचा म्हणजेच आपल्या शुद्ध आत्म्याचा साक्षात्कार करू शकतो.
आत्मसाक्षात्कार अथवा परमात्म प्राप्तीच्या पूर्वी सर्व साधक-साधिकांना मानसिक संघर्ष करून बाह्य आणि आंतरिक बाधांना पार करावे लागते. साधनेमध्ये प्रगती करण्यासाठी साधकाला ईश्वराची कृपा आणि सद्गुरूंचे मार्गदर्शन प्राप्त व्हायला हवे आणि त्याचबरोबर साधकाने स्वतः निष्ठापूर्वक नियमित साधना करीत असताना सतत सावधान असले पाहिजे. साधनेच्या प्रारंभीच्या काळात प्रवर्तक ईश्वराच्या मानवी रूपाशी व गुणांशी – अवताराच्या स्वरूपाशी आपल्या शुद्ध भावना संयुक्त करून ईश्वराशी आपला संबंध स्थापित करू इच्छितो. जेव्हा साधनेद्वारे ईश्वराशी हा भावनात्मक संबंध स्थापित होतो, तेव्हा साधक ईश्वरानुभवाच्या उच्चतर स्तरांवर क्रमशः अग्रेसर होत असतो; आणि त्याला अमानवी, अपुरुषविध, निर्गुण-निराकार ब्रह्माची धारणा होते. याचे तात्पर्य हे की, याच साधनाक्रमामध्ये साधक उपनिषदोक्त ब्रह्म-आत्मा ऐक्याचा अनुभव घेण्यास समर्थ होत असतो. अनुभव सिद्ध लेखकाने साधकांना अनेक ठिकाणी या ग्रंथात योग्य सूचनात देत असताना ताकीदही दिलेली आहे, जेणेकरून त्यांच्या साधनेत बाधा न येवो. प्रत्येकच व्यक्ती दृढ निश्चय करून गुरूच्या मार्गदर्शनानुसार ऐहिक व पारलौकिक भोग-सुखांचा त्याग करू शकते आणि साधनेच्या द्वारे आध्यात्मिक अनुभूतीची अधिकारी होऊ शकते, हे सत्य ह्या ग्रंथाच्या अध्ययनाने वाचकाच्या मनावर अंकित होते.
श्रीमत स्वामी यतीश्वरानंद महाराजांचा संक्षिप्त जीवन-वृत्तांत आणि त्यांनी लिहिलेले त्यांच्या गुरूंचे – श्रीमत् स्वामी ब्रह्मानंद महाराजांचे, जे भगवान श्रीरामकृष्णांचे शिष्य होते – संस्मरण या ग्रंथाच्या आरंभी दिलेले आहे. त्यांच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाने भारतातील आणि विदेशातील अनेक स्त्री-पुरुष शिष्यांची व भक्तांची जीवने बदलून गेलीत आणि त्यांना आपल्या जीवनांत आध्यात्मिक शांतीचा अनुभव आला होता. ते सर्व श्रीरामकृष्णांच्या आदर्शाचे आणि वेदान्त तत्त्वांचे संदेशवाहक होवोत अशी पूजनीय महाराजांची इच्छा होती. त्यांनी हा ग्रंथ आपली विद्वत्ता प्रदर्शित करण्यासाठी किंवा कोणतेही तत्त्वज्ञान सांगण्याच्या दृष्टीने लिहिला नसून, साधक-साधिकांचा आध्यात्मिक विकास कसा होईल याच दृष्टीने या ग्रंथातील विषयांचे प्रतिपादन केले आहे. स्वामी यतीश्वरानंद महाराज इ.स. १९५१ ते १९६५ पर्यंत बंगलोरच्या श्रीरामकृष्ण आश्रमाचे अध्यक्ष असताना प्रा. (डॉ.) प्रभुशंकर हे त्यांचे स्वीय सहाय्यक व त्यांच्या नेहमीच बरोबर राहून सेवा करणारे निष्ठावान शिष्य होते. आता ते वृद्ध झाले असून म्हैसूरला आपल्या मुलीजवळ राहतात. आम्ही म्हैसूरला गेलो असताना म्हैसूरच्या श्रीरामकृष्ण आश्रमात त्यांना बोलावून आम्ही त्यांना पू. स्वामी यतीश्वरानंद महाराजांच्या दिनचर्येविषयी विचारले. तेव्हा ते खूप भावूक झाले आणि त्यांनी आम्हाला जी माहिती सांगितली ती सर्व वाचकांसाठी व साधकांसाठी प्रेरणादायक व उद्बोधक आहे. ते म्हणाले, “स्वामी यतीश्वरानंदजी महाराज अगदी पहाटे उठत असत. प्रातर्विधी व मुखमार्जन आटोपून मग स्वच्छ कपडे घालून ते ध्यानाला बसत असत. दीड-दोन तास ध्यान-जप केल्यावर शास्त्रातील काही वाचीत असत व प्रार्थना म्हणत असत. त्यानंतर थोडा व्यायाम करीत असत. मग आश्रमातील साधु-ब्रह्मचाऱ्यांसाठी शास्त्राचे वर्ग घेत असत. नंतर स्नानादी करून आश्रमवासियांसोबत न्याहरी करीत असत. सुमारे आठ वाजता थोडा वेळ वर्तमानपत्र वाचून त्यानंतर भेटणाऱ्या भक्तांबरोबर अथवा ज्यांनी आधी मुलाखतीची वेळ मागितली असे त्यांच्याशी बोलून त्यांचे समाधान करीत. नऊ वाजताच्या सुमारास ध्यानास बसत असत. एक दीड तासांनी आपल्या खोलीच्या बाहेर येत. आश्रमातील साधु-ब्रह्मचाऱ्यांना काही सूचना, आश्रमाचा पत्र-व्यवहार, आलेल्या पत्रांची उत्तरे इत्यादी देत असत. पुन्हा थोडा वेळ ध्यान करून मग दुपारचे जेवण करीत. मग थोडी वामकुक्षी घेऊन लिखाण करीत. दुपारी तीन वाजताच्या सुमारास आणखी ध्यान करीत असत. ध्यान झाल्यावर शास्त्रातील काही उतारे वाचीत व मनन-चिंतन करीत असत. खोलीतून बाहेर येऊन सायंकाळपूर्वी आश्रमात फिरत असत. सायंकाळी मंदिरात संध्यारती व भजने होत असताना तेथे येऊन बसत असत. आरतीनंतर पुन्हा ध्यान-जपाला बसत असत. रात्रीचे जेवण साधारणतः नऊ वाजता झाल्यानंतर आश्रमातील सर्व साधु-ब्रह्मचारी त्यांच्या खोलीत येत असत व तेथे कोणी साधु वा ब्रह्मचारी कोणत्यातरी आध्यात्मिक पुस्तकाचे वाचन करीत असे. स्वामीजी मधे मधे ते समजावून सांगत असत. रात्री सर्व सामसूम झाल्यावर मध्यरात्री स्वामी यतीश्वरानंदजी ध्यान करीत असत नंतरच ते निद्रा घेत. ते फार कमी वेळ झोपत असत.