Product Details
स्वप्नाविषयी मानवाला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. कुणाला त्यात भावी घटनांची पूर्वचिन्हे दिसतात, तर कुणाला त्यात होऊन गेलेल्या घटनांची प्रतिबिंबे आढळतात. कुणाला त्यात भगवंताची लीला पाहावीशी वाटते, तर कुणाला त्या स्वप्नांचा भेद करून मनाच्या पलीकडे जाण्याची स्पृहा असते. आणि म्हणूनच निरनिराळ्या दृष्टिकोनांतून मानवाने स्वप्नांकडे बघितले आहे. डॉ. फ्रॉईड प्रभृती आधुनिक पाश्चात्त्य मानसशास्त्रज्ञांनी विशेषेकरून रोग्यांच्या स्वप्नांचा अभ्यास करून मानवी मनोव्यापारांचे विश्लेषण केले व या अपुर्या विश्लेषणातून लावलेले ‘शोध’ सरसकट सर्वांनाच लागू म्हणून जगापुढे मांडले. त्यांच्या ह्या ‘आडाख्यां’नी काही रोग्यांचा फायदा झाला असेल खरा, परंतु त्यामुळे मानवाविषयीची विकृत धारणा प्रसृत झाल्यामुळे एकूण मानवजातीची फार हानी झाली व होत आहे. याउलट आचार्य गौडपाद प्रभृती भारतीय जीवनशास्त्रज्ञांनी स्वप्नाच्या संपूर्ण प्रक्रियेचा मूलस्पर्शी अभ्यास केला, स्वप्न-जागृती इत्यादींच्या तुलनात्मक अनुशीलनातून मानवी मनाचा ‘तळ’ गाठला आणि सत्याच्या आपल्या त्या प्रत्यक्ष अनुभवानुसार मानवी मनाचे — मानवाचे — खरे स्व-रूप व्यक्त करून दाखविले. ह्या सत्यदर्शी ऋषींनी व भगवान श्रीकृष्णादिकांनी मनाचे सूक्ष्म अनुशीलन करून, त्यावर संपूर्ण विजय प्राप्त करण्याचा उपाय मानवाला दाखविला आणि त्यायोगे प्रत्येकाला खर्या, शाश्वत सुखाचा मार्ग मोकळा करून दिला.