Rs.200.00
Author
Swami Jagadatmananda Pages
449 Translator
Dr. Vinay Vaidya Product Details
सध्याचा आपला काळ हा एक वैशिष्ट्यपूर्ण संक्रमणाचा आहे. एका दृष्टीने अतिशय उत्कृष्ट आणि दुसऱ्या दृष्टीने अत्यंत निकृष्ट, वाईट! आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मागच्या काही वर्षात आकाशात झेप मारल्यासारखी कल्पनातीत प्रगती केली आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात त्याचा सुखावह परिणाम सर्वांना दिसून येत आहे. विज्ञानाने बहाल केलेल्या अमर्याद सुखसोयींच्या साधनामुळे आपला जीवनसंघर्ष खरोखरच कमी झाला आहे, सर्वसाधारण आयुष्य वाढले आहे, साथीच्या रोगांवर नियंत्रण आले आहे. मुख्य म्हणजे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी कितीतरी साधने सहजतेने उपलब्ध झाली आहेत. ज्याला आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाने स्पर्श केलेला नाही किंवा तेथील आधीची रचना बदललेली नाही असे एकही क्षेत्र उरले नाही; ही झाली नाण्याची दिसणारी एक बाजू. परंतु, त्याचबरोबर नाण्याची दुसरी न दिसणारी, पण अपरिहार्यपणे स्वीकारावी लागणारी बाजूसुद्धा असतेच. याच आधुनिक वैज्ञानिक जडवादी तत्त्वज्ञानावर आधारून येणारे महाभयंकर अनर्थ – गळेकापू स्पर्धा, बटबटीत रूपाने येणारी भोगवादी प्रवृत्ती वगैरे – हे मानवाच्या चारित्र्याला आतून-बाहेरून पोखरून काढत आहेत, त्याचे नैतिक पतन घडवून आणत आहेत आणि त्याला विनाशाच्या गर्तेत फेकण्यास आतुर झाले आहेत. मागच्या अनेक शतकांत असे स्थित्यंतर कधीच दृष्टीस पडले नव्हते. संपूर्ण जग आणि त्यातील माणसे फारच झपाट्याने बदलत आहेत. पिढ्यानुपिढ्या जपून ठेवलेल्या आदर्शरूप जीवनमूल्यांच्या चिंधड्या उडत आहेत आणि काही मोजक्या जाणत्या लोकांना असहाय, हताश नजरेने पाहण्याव्यतिरिक्त उपाय उरलेला नाही. हीच आहे आपली सध्याची समस्या. आणि याच समस्येची समीक्षा व चिकित्सा प्रस्तुत पुस्तकात स्वामी जगदात्मानंदजींनी त्यांच्या सिद्ध लेखणीतून केली आहे. वेदान्ताने सांगितलेली महान आदर्श तत्त्वे ही श्रीरामकृष्णांच्या जीवनात साकारली. त्यावर स्वामी विवेकानंदांनी आपल्या लेखणी व वाणीद्वारे प्रभावी भाष्य केले. श्रीरामकृष्ण-विवेकानंद यांचे दिव्य जीवन व कार्य तसेच आपली भारतीय संस्कृती यांना केंद्र करून या पुस्तकाची रचना वाचकांसाठी, विशेषकरून युवा पिढीसाठी करण्यात आलेली आहे. यामध्ये अनेक सत्य घटना, विविध दृष्टान्त, उपमा, उदाहरणे तसेच आधुनिक वैज्ञानिकांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांतील संदर्भ, आपल्या रोजच्या जीवनात ठळकपणे आढळणारे प्रसंग यांचा भरपूर वापर करण्यात आला आहे. म्हणून कोणताही मुद्दा कंटाळवाणा अथवा डोईजड न होता अतिशय सहजतेने आपल्याला समजून घेता येतो. विशेषतः कर्मसिद्धान्त, जन्म-मृत्यूचे रहस्य, पुनर्जन्म आणि आपल्या राष्ट्रीय समस्या यांचे विश्लेषण करताना लेखकांच्या या शैलीचा आपल्या मनावर चांगलाच ठसा पडतो. आपल्या तरुण वर्गाला आता ‘उपदेश ऐकणे’ वगैरे प्रकार रुचत नाहीत, म्हणूनच त्यांच्यासाठी हे पुस्तक एक अद्भुत ठेवास्वरूपच आहे. मानसिक संघर्षात सापडून हतबल, निराश झालेल्यांना या पुस्तकातून अमोघ प्रकाश मिळून त्यांची जीवने आत्मविश्वासाने भरून जातील. ध्येयाची नव्याने ओळख होऊन त्याकडे जाण्यासाठीचा मार्ग व मार्गक्रमण करण्यासाठी लागणारी ऊर्जा या पुस्तकाच्या वाचनाने अवश्य मिळेल, याची आम्हाला खात्री आहे. रामकृष्ण संघाचे ज्येष्ठ संन्यासी स्वामी जगदात्मानंदजी यांनी कानडी भाषेत लिहिलेल्या मूळ पुस्तकाचे नाव ‘बदुकलू कलियिरी’ असे आहे. या कन्नड भाषेतील पुस्तकाच्या एक लाखाहून जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. त्यानंतर इंग्रजीतून सिंगापूर येथील रामकृष्ण मिशनद्वारे त्याचे प्रकाशन ‘Gospel of the Life Sublime’ या नावे झाले. त्यालाही प्रचंड मागणी होती. नंतर चेन्नई येथील श्रीरामकृष्ण मठाद्वारे त्याचे इंग्रजीमध्ये ‘Learn to Live’ या नावे दोन भागांत प्रकाशन झाले. त्यालासुद्धा उदंड प्रतिसाद मिळाला. काही वर्षांपूर्वी कोलकाता येथील अद्वैत आश्रमातून ‘जीना सीखो’ आणि ‘जीने की कला’ या नावांनी हेच पुस्तक दोन भागांत उपलब्ध करून देण्यात आल्यावर हिंदी वाचकांनीसुद्धा याचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. प्रस्तुत पुस्तक इंग्रजी व हिंदीमध्ये दोन खंडांत असलेले हे पुस्तक आम्ही मराठीमध्ये वाचकांच्या सोयीसाठी एकत्रित एकाच खंडात प्रकाशित करीत आहोत.