Product Details
भगवान श्रीरामकृष्णदेवांच्या आदेशानुसार, त्यांच्याच प्रेरणेने स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरुबंधूंच्या सहकार्याने ज्या ‘रामकृष्ण-संघा’ची उभारणी केली तिच्या शाखा आणि तिची कार्ये आज समस्त जगभर पसरली आहेत. रामकृष्ण-संघ आज भारत, सिंहल, ब्रह्मदेश, मलाया, फिजी, मॉरिशस इत्यादी देशांत धर्मप्रचार, रोगपीडितांची सेवा, दुष्काळ-पूर इत्यादी आपत्तींनी ग्रासलेल्यांना साहाय्य, शिक्षणदान वगैरे कामे करीत असून, उत्तर व दक्षिण अमेरिका, इंग्लंड, युरोपीय देश इत्यादींत वेदान्तप्रसाराचे कार्य करीत आहे. याप्रमाणे समस्त जगभर धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रीय इत्यादी नाना क्षेत्रांत ही जनसेवेची भिन्न भिन्न कार्ये करणाऱ्या ‘रामकृष्ण-संघा’चा प्रारंभ, विकास, ध्येय, प्रेरणा इत्यादी जाणून घेण्याची अनेक बंधुभगिनींची इच्छा असते.
समस्त जगाच्या एका संकटमय संक्रमण कालात भगवान श्रीरामकृष्ण, श्रीसारदादेवी आणि स्वामी विवेकानंद यांनी आपल्या जीवनाने आणि वाणीने केलेल्या ऐतिहासिक कार्याचा ओझरता परामर्शही लेखकाने मोठ्या मार्मिक रीतीने ह्या लहानशा पुस्तकात घेतला आहे. ह्या पुस्तकाला आम्ही तीन महत्त्वाची परिशिष्टे जोडली आहेत. त्यावरून वाचकांना रामकृष्ण-संघाच्या स्वदेश-विदेशांतील उपर्युक्त बहुविध व्यापक कार्यांची आणि शाखांची कल्पना येऊ शकेल.
रामकृष्ण-संघाचे उपाध्यक्ष स्वामी विशुद्धानंदजी यांनी मुळ पुस्तकाला लिहिलेल्या सुंदर भूमिकेचाही अनुवाद प्रस्तुत पुस्तिकेत समाविष्ट केला आहे. त्याने तिचे महत्त्व आणखीच वाढले आहे. हे निराळे सांगावयास नकोच. या ‘भूमिके’त (ठाकुर) ‘माताजी’ आणि ‘स्वामीजी’ हे शब्द अनुक्रमे श्रीरामकृष्ण, त्यांच्या लीलासहधर्मिणी आणि स्वामी विवेकानंद यांच्यासाठी वापरण्यात आले आहे.
असल्या प्रकारच्या पुस्तकाची बऱ्याच दिवसांपासून भासणारी उणीव भरून काढण्यासाठी प्रकाशित केलेल्या ह्या पुस्तकाचे वाचक सहर्ष स्वागत करतील.